Saturday, June 20, 2020

कौलारू शाळा

         "कौले"...एक लुप्त होत जाणारं बांधकाम मटेरियल..हो खरचं....आता कौले तशी फारशी दिसत नाहीत...नाही का!..तरी कोकणात गावांत अजूनही आहेत. पण कोकणापलीकडे इतर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात कौले हे बांधकामातील छप्पराचे मटेरियल बहुधा शाळांना वापरण्यात येई. प्रत्येक गावाखेड्यातली शाळा कौलारू असे किंबहुना आहेत. अजूनही मतदान वगैरे करण्यासाठी जेव्हा शाळेत गेल्यावर, त्या जुन्या आठवणी व आपण लहान होतो, त्याच्या कितीतरी आधीपासूनच असलेली ती टुमदार कौलारू शाळा, आपण मोठे झालो तरीही तशीच, बऱ्याच वर्षांची व बऱ्याच बालपणांची साक्ष घेऊन आपल्याला उभी दिसते..आणि मग पुन्हा आपल्या बालपणात घेऊन जाते.

         खूप गम्मत दडलेली असते कौलारू शाळांमध्ये... वर पाहिलं की अत्यंत भव्यतेच दर्शन वर्गात असताना होत असे..कारण, कौलाचा घुमट मोठा असतो. त्यावर लाकडी त्रिकोणाकृती आकृती असते. ज्याला "ट्रस" म्हणतात हे नंतर कळलं. त्यांवर पंखे लटकवलेली असतं. पण तेव्हा ते सगळं मजेशीर होतं. भिंतीही अत्यंत मोठ्या आणि टुमदार वाटत. ज्यात वरच्या बाजूस त्रिकोण आकार असे. त्यांवर सुविचार, काही थोर व्यक्तींची छायाचित्रे.. (छायाचित्रे कधीही चिकटवलेली नसून ती सुंदरपणे रेखाटलेली व सुबक पणे रंगवलेली असत), शाळेचा काही दस्तऐवज ठेवण्यासाठी दोन खुंट्यांमध्ये अडकवलेली एक फळी, ज्यावर ठेवलेली ती जुन्या धूळखात पडलेल्या काही फाईली (फाईल्स). बरं हे सगळं दस्तऐवज कोण्या एकाच वर्गात लटकवलेली दिसत, या सगळ्याचा भार एकच वर्गावर असे. मग त्या उंचच उंच भिंतींवर चारही बाजूंस दिशेची नोंद असे. म्हणजे, पूर्व पश्चिम असे लिहिलेले असे. त्या भिंती जर आपल्या आताच्या बांधकामाप्रमाणे चौरसकृती, अगदी टापटीप जरी असत्या तरी ती गम्मत किंवा तो अवाढव्यपणा ज्याला आपण भव्य असंही म्हणू शकतो तो कदाचित नसता...

        कौलांचेही काही प्रकार असतात, ज्यात काही कौले गोलाकार स्वरूपात आढळतात तर काही आयताकृती आणि त्या लाकडी सांगाड्यावर ती विशिष्ट स्वरूपात अडकवलेली असतात. ज्यासाठी कौलांनाही विशिष्ट स्वरूपाचे खाचे असतात. ज्याला आपण 'कट्स' म्हणू शकतो. बऱ्याचदा ही कौले फुटत, चेंडू लागून म्हणा किंवा काही आगाऊ नग उगाच मस्ती म्हणून दगडेही मारत. मग उन्हाची तिरीप वर्गांत झंकरायची. त्या तिरीपनुसार मग मुले अॅडजस्ट होत.. बऱ्याचदा शाळेच्या आवारात ती फुटलेली कौले पडलेली दिसत, ज्यास शिक्के म्हणून मुले वापरत असत. म्हणजे पेन्सिलने ज्यावर काहीतरी लिहावयाचे आणि ते हातांवर उमटवायचे..झाला शिक्का..त्यात कोणी बहाद्दूर बरोबर उलटे नाव लिहा मग ते सुलटे होऊन उमटे... भारी गम्मत होती यांत..कौले गोळा करणे हा त्यावेळेस काही लोकांचा जणू छंदच आहे असे ते वागत. त्यांना त्या वेळेस कोणी विचारले असते की छंद सांगा, आणि ते कौले म्हटले असते तर यात वर्गात कोणासही काही वावगे वाटले नसते. कारण, तो तेथे एक मान्यताप्राप्त छंद म्हणून उदयास आला होता. ज्यापासून नुसते शिक्के च नव्हे तर आणि खूप अश्या गोष्टी करता येत असत. त्यांची घरे, किल्ले , घाट , बोगदे, आणि बरेच काही. अशी कौले बालपणाच्या शाळेतील एक खूप महत्त्वाची आठवण आहेच आणि नेहमीच राहील. 

         मग ज्यावेळेस पावसाळा येत असे, म्हणजे नुकतीच शाळा सुरू होई तेव्हा काही कौले फुटली असल्याने किंवा कौलारू रचनेमध्ये कोठे बारीक छिद्रे राहिल्यामुळे ती गळत आणि पाण्याची धारही लागे. मग नुकतीच नव्या वर्गात आलेली आम्ही सारी मंडळी जुन्या वर्गाची आठवण काढत. व ते वर्ग किती छान होते वगैरे वगैरे कुजबुज काही दिवस चालू असे. मग काही दिवसांनी हा वर्गही आपला वाटू लागे. मग पुन्हा त्या वर्गसजावटी सुरू होत विवध तक्ते, गणिती सूत्रे, यांचे पोश्टर्स लावले जात, या सगळ्यात गमतीशीर तक्ते असत ते वरती दोरीस जोडलेले तक्ते ते तरंगत असत, काय सुंदर दिसायचे वर्ग तेव्हा..!! आणि त्यात भर म्हणून पताके. पताक्यांना भारतीय सजावटीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थात ते साधे जरी असले तरी परिसर गजबजून सोडायचे लकब त्यांच्यात आहे. अश्या सुंदर सजावटीमध्ये जी आम्हीच केलेली असायची त्यामुळे शाळा आणि वर्ग आणखीनच हवेहवेसे वाटायचे. या पावसाळी दिवसांत बऱ्याचदा मैदान ओले असल्यामुळे अथवा पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याचदा प्रार्थना, राष्ट्रगीत हे व्हरांड्यात होत असे. टुमदार कौलारू शाळांचा व्हरांडा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असे. असा अत्यंत रुंद किमान चार पाच फारशा असलेला तो व्हरांडा! त्यात सगळी मुले दाटून भरून राष्ट्रगीत म्हटले जात असे, आणि पार्श्वसंगीत म्हणून पावसाची रिपरिप आणि सोबत कौलांवर पडणाऱ्या थेंबाचा आवाज. मग प्रतिज्ञा म्हणातांना पुढच्या खांद्यावर हात ठेवण्याची जणू मुबाचं मिळाली आहे असे थाटात हात टेकवणे. कारण येथे व्हरांड्यात सारेच दाटीवाटीने भरलेले. मग काही दिवसांनी एखादा रविवार पाहून शाळा कौले दुरुस्तीचा कार्यक्रम आखत असे. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर एकही उन्हाची तिरीप न पाहून अवाक होणारे चेहरे आणि नवीन कौले बसवल्याची माहिती होणे हे काही महिन्यातून होतच असे. आता माझी प्रार्थमिक शाळा आठवली; तर आमचे सर सुद्धा मला आठवतात आणि त्या वेळेस अशी पद्धत होती की प्रायमरी शाळांत म्हणजेच १ली ते ४थी पर्यंत एकच शिक्षक शिकवत, (आता आहे की नाही माहित नाही), शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं तस एकदम घट्ट होत असे. आणि एके दिवशी आम्ही ४ थीत असताना आमचे सर आम्हास सांगू लागले की, माझी बदली झालीय आणि मला आजच शाळा सोडावी लागेल. आम्हा सगळ्यांना जणू धक्काच बसला, खूप वाईट वाटल. कारण, खूप आवडते सर ज्यांनी शिक्षणाची गोडी लावली ते शाळा सोडणार होते, आम्हीही आता ४थी नंतर मोठ्या शाळेत जाणार होतो, कारण शाळा १ली ते ४थी एवढीच होती. पण अजून ४ थीच वर्ष अर्धे बाकी होते आणि सर सोडून जाणार म्हटल्यावर अख्ख्या 'अ'तुकडीला म्हणजे आमच्या वर्गास खूप दुःख झाले. जेव्हा सर दुपारी जाण्यास निघाले तेव्हा आमचा अख्खा वर्ग बाहेर होता. आणि आम्ही अक्षरशः रडलो होतो. मग सगळ्यांनी सरांच्या पाया पडून सरांना निरुप दिला. शिक्षक आणि विद्यार्थी हे नात किती सुंदर असु शकत याचं प्रात्यक्षिक त्या दिवशी आम्ही आणि आमचा सरांनी अख्ख्या शाळेस दाखवलं आणि अप्रत्यक्षपणे आम्हा स्वतःसही... खरे तर शाळेचे किस्से हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अमूल्य ठेवा असतो. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आणि आठवणी आपल्याला त्या विश्वात घेऊन जाऊ शकतात जस की, कौलांवरून मी या आठवणी वर आलो..असो पण शाळेतील कौलारू छ्ते उंचच उंच अशा भिंती पुढे आपण कितीही चकचकीत महाविद्यालयात अगदी वातानुकूलित वर्गात जरी शिकलो, वावरलो तरी त्या कौलारू वर्गांसाठी एक वातानुकूलित खोली आपल्या मनात नेहमी दडलेली असते हे मात्र नक्की...!!
          
          

Thursday, June 11, 2020

धर्म

धर्म काय आहे. खरं तर मानव समाज आणि मानवी मूल्य हे मानवास शिकविण्यासाठी अत्यंत पवित्र आणि निर्मळ हेतूने तयार केलेली सुंदर गोष्ट. धर्म काय शिकवतो, तर धर्म आम्हास प्रेम शिकवतो, नाती शिकवतो, जिव्हाळा शिकवतो....अजुन धर्म काय शिकवतो, तर तो बंधुप्रेम, पिताप्रेम, नम्रता, शांतता, परिवार, समाज, मित्र, बहीण, पत्नी, पती, मातापिता, आदर, या सगळ्या आणि याहून अधिक गोष्टी अगदी उत्तमपणे मांडतो.
       खरं तर प्रत्येक धर्म खूप श्रेष्ठ आणि सुंदर आहे. कारण त्याचा उद्देश इतका पवित्र आहे की त्यात तुलना हे भावचं नाहीत. ते निर्मळ आहेत. खर तर अशा सुंदर उद्देशाने आणि मानवी जीवन मुल्यांनी आणि संस्कारांनी भरावं म्हणून असलेला धर्म जो कुठलाही असो ती खरंच किती श्रेष्ठ आहे!!.. तर मग आपण धर्मावरून खरं तर का भांडतो? ही अशांतता कुठून येते? आणि ही उच्च - नीच्च भावना येते तरी कुठून? तर ती येते तो धर्म चुकीच्या पद्धतीने आणि गलिच्छ मानसिकतेने पसरविणाऱ्या लोकांमुळे...कारण आपण आपला धर्म मानतो खरी पण तो वाचत नाही. हिंदू, इस्लाम, ख्रिचन, बौद्ध आणि इतर कुठलाही धर्म असो यात कधीही भेद नाही शिकवला. पण तो कदाचित पसरविण्यात आला. अज्ञान वाईट.. खरचं अज्ञानाने सारं काही नेलं. असं महात्मा जोतिबा फुलेंनी का म्हटलं असेल याचं प्रात्यक्षिक जणू आहे हे सगळं. धर्म निर्माण कसं झाला??... खरं तर विविध रूपानं मानव सुधारून त्याला सारं काही शिकवावं जे सांसारिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध पैलूंवर उत्तमपणे खेळता यावं.त्याला सगळं हाताळता यावं मणून धर्माची निर्मिती झाली असावी. आणि सगळ्या धर्मांनी मानव जीवन सुखकर आणि समृद्ध करण्याठी अमूल्य योगदान दिले आहे. यामुळे भेद न करता आपल्या धर्माबरोबर सगळ्या धर्माचा आदर करणे हे मानवीय आहे. बाकी सारे अमानवीय!! कारण ज्या गोष्टी आपल्या म्हणजेच मानवाच्या प्रगतीशीलतेसाठी आहेत त्यावरून भांडणे म्हणजे कदाचित विवेकी गहाण ठेवणे!!...

आपण काय बदल करू शकतो?
       आपण प्रत्येकानी आपल्या समाजातील किंवा परिसंस्थेतील सर्वांनी आपल्या व इतर सर्व धर्मांची धर्मग्रंथ वाचावीत. आणि कोण दुसऱ्याच्या सांगण्यावर न जाता आपण तो निष्ठेने वाचवा. आपल्या मनातील सगळी धूळ निघाल्याशिवाय राहणार नाही.  काही क्रूर आतंकवादी संस्था बालमनावर देवाच्या नावानं आणि धर्माच्या नावावर काहीही सांगून द्वेषाची भावना निर्माण करतात जे की मानवी जातीसाठी धोक्याचे आहे. धर्म ही उन्नतीची गोष्ट आहे. धर्म आपल्यासाठी आहे, आपण धर्मासाठी नाही, हा विचार रुजायला हवा. धर्म भेद कधीही शिकवत नाही. तो मानवता मात्र शिकवतो आणि आपण त्याच धेमाच्या नावाने भेद करतो. याहून मोठा अपमान धर्माचा काय असू शकतो!...एखादा प्रदेश हा विशिष्ट धर्माचा आहे, आणि त्यामुळे इतरांवर अन्याय करणे हे कुठलाही धर्म सांगत नाही. धर्म शिकवतो तो समभाव, मित्रत्व, प्रेम ती भावना ठेवली तर सगळे धर्म अबाधित राहतील आणि आपल्यातच जिवंत राहतील. त्याला वाचवण वगैरे आणि त्या नावाखाली द्वेष निर्माण कारण या गोष्टी होणार नाहीत.
         आपला अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान छ्त्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी कधी धर्म पाहून राजकारण केलं नाही, कधी मैत्री आणि शत्रूही नाही. महाराजांनी धर्म हे कधीही मोजमाप म्हणून न वापरून फक्त प्रगतीसाठी वापरलं आणि रयातेच कल्याण केलं. आजही काही अज्ञानी वर्ग असं मानतो की महाराज फक्त हिंदुराजे होते आणि दुसऱ्या धर्माशी ते लढले आणि त्यांचा उद्देश धर्म वाचवन होता..किती चुकीची माहिती घेऊन फिरतात काही लोक..महाराज मुघलांशी लढले इस्लाम धर्माशी नाही. महाराजांना आणि छ्त्रपती शंभूराजांना देखील कुराण माहित होते. महाराजांना सर्व धर्मांची शिकवण माहीत होती, अंगीकृत होती. आणि ते लढले ते कल्याणासाठी, ते जिंकले ते शुद्ध आणि निर्मळ हेतुमुळे, आणि मुघल हरले ते कपटी, धर्मवादी, जातीवादी हेतूंमुळे.. मग जर महाराज कधी भेद करत नव्हते तर आपण कोण आहोत?

Wednesday, June 10, 2020

अविस्मरणीय अनुभव...!! जे.एन.पी.टी.

       ते इंजिनीअरिंगचं तृतीय वर्ष होतं आणि नेहमीप्रमणेच या वर्षीही भरपूर इंडस्ट्रियल व्हिजीट्स, तसेच  visitsच्या नावाखाली होणाऱ्या ट्रीपस् हे सारं पुन्हा होणारचं होतं...स्थापत्य शाखेची हीच गम्मत असते....कारण स्थापत्यशास्त्र हे चार भिंतींच्या आत बसूनच शिकणं हे शक्य नाही....हे सेमीस्टर सुरू झालं, पाचवं सेमीस्टर खरं तर मला कोणी विचारलं की इंजिनीअरिंगमध्ये सर्वात आवडता कालखंड अथवा आवडतं सेमीस्टर कोणतं तर मी बेशकः पाच असं म्हणतो....कारणे भरपूर आहेत!!....असो!, तर या सेमीस्टर मधल्या  व्हिजीट तश्या खूप छान होत्या जवळपास पाच इंडस्ट्रिअल व्हिजीट आम्ही केल्या आणि पाचवी म्हणजे सेमीस्टरच्या अगदी शेवटची visit होती ती म्हणजे जे. एन् पी. टी. व्हिजीट..जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई....उत्तर महारष्ट्रातील असल्यामुळे पोर्ट, समुद्र, जहाजं. या साऱ्या गोष्टीसाठी च आकर्षण साहजिकच मला होतं...खरं म्हणजे पोर्ट सारख्या ठिकाणी एकट्याला फक्त मालवाहतूक भलीमोठी जहाजं बघण्यासाठी, आत कधी प्रवेश मिळेल हे शक्य नव्हतं ..नाहीच!, त्यासाठी तुम्हालाचं मग मालवाहतूक करणाऱ्या क्षेत्रात कदाचित पाऊले टाकावी लागतील किंवा त्यातं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे वशिला लाऊन आत प्रवेश मिळवावा लागेल....पण अशी संधी अगदी चालून आली होती ...मला त्या दिवशी माझ्या कॉलेज आणि विशेषकरून आमची डिपार्टमेंट याच्याबद्दल आदर द्विगुणित झाला...या व्हिजीट्स  म्हणजे वेगळाच आनंद असतो..या visit ची घोषणा आमच्या HOD सरांनी केली आणि त्यासाठी वर्गणी गोळा करण्यास ही सांगितली, कारण कॉलेज या visit चा अर्धा खर्च करणार आणि आम्ही अर्धा असं त्यांच्यात ठरलं होतं.. मी CR असल्यामुळे सरांनी मलाचं ते पैसे गोळा करायला सांगितले....पण, दुसऱ्या दिवशी कॉलेज बद्दल आदर आणखीच वाढला ..कारण आता या ट्रीपचा.....visit कॉलेज साठी होती आमच्यासाठी आणि आमच्या डिपार्टमेंट साठीही ती ट्रीपचं होती..!!...तर या ट्रीप कम visit चा सगळा खर्च अगदी जेवणापासून कॉलेजचं करणार होतं....खरं तर याच्या अगदी काही दिवसा आधी आमच्या कॉलेज ल NAAC तर्फे A ग्रेड मिळाली होती आणि कॉलेज सर्वांवर खुश होते; त्याचा हा परिणाम असेल असं आम्ही गृहीत धरलं.
          Visit चा दिवस ठरला, सगळी तयारी डिपार्टमेंट मधल्या CESA  नामक आमची जी स्टुडंट्स असोशिएशन होती त्यातील आम्हीच निवडलेल्या आमच्याच सहकाऱ्यांनी केली; आणि तो दिवस उजाळला.  त्या दिवशी अगदी पहाटेचं निघण्याचा प्लॅन ठरला. आता पहाटे लवकर उठतील ते इंजिनीअर्स कसले!! कारण, उशीर फक्त आम्हीचं नाही तर आमच्या सोबत येणाऱ्या प्रोफेसरस् मंडळींनीही केला. शेवटी तेही इंजिनिअरच !! मग ठरवलेल्या ठीक ६:०० चे ७:३० झाले, आणि आमची bus खरं तर दोन बसेस होत्या, त्या निघाल्या. निघतांना अत्यंत दमदार आवाजाने "छ्त्रपती शिवाजी महाराज की, जय!!!" ही घोषणा साहजिकच झाली आणि महाराजांचं नाव घेऊन आम्ही निघालो....visits किंवा सहल, मित्रांसोबत असो अथवा परिवारासोबत त्यातील आणखी एक सुंदर कालखंड म्हणजे प्रवासाचा; कारण, विविध ठिकाणांना होणारी ती धावती भेट, विविध गावं, दऱ्या, खोऱ्या, घाट, वळणदार रस्ते, गावांची वेगळी नानाविविध नावे, त्यातील विविधता, घरे, गावं रचना या गोष्टींचा ओझरता अनुभव एक सुंदर आठवण असू शकते!!
         आम्ही जात असलेलं ठिकाण पुण्याहून साधारणतः ३-३:३० तास अंतरावर होते आणि आमच्या मार्ग होता आपल्या देशातील प्रथम द्रुतगती महामार्ग म्हणजेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग.. गाडी नऱ्हे म्हणजेच जिथे आमचं कॉलेज होत आणि आम्ही राहतही होतो. इथून बाहेर पडली आणि हायवे ने मुंबई च्या दिशेने निघाली. मी पहिल्यांदा द्रुतगती मार्ग पाहणार होतो आणि मला उत्सुकता होती. आता गाडीमध्ये सुरू झाले होते गाणे आणि डान्स. या नृत्यास नृत असं म्हणतात ज्यात नृत्याच्या शास्त्रोक्त बाबी नसतात, पण भरपूर आनंद आणि जल्लोष व्यक्त करण्याचं ते उत्तम साधन असतं आणि यात ज्याला नृत्य नीट नाही करता येत, म्हणजे माझ्यासारखे त्यांनाही सगळा संकोच विसरून निर्धास्त व बेभानपणे नाचण्याची मुभा सुद्धा असते. साहजिकच झिंगाट गाणं सुरू झालं आणि अख्खी बस जल्लोषाने भरून गेली. काही मुलं असतात प्रत्येक ग्रुप किंवा वर्गांमध्ये जे त्यांच्या अजब आणि विचित्र पण तरी खूप आनंददायक आणि सर्वांना हसवणारे नृत्य करण्यासाठी प्रसिद्ध असतात. तसेच काही महाभाग आमच्यात सुद्धा होते आणि त्यांनी त्यांचं काम चोखपणे करून सगळ्यांना हसवलं. त्या इवलिश्या जागेत सुद्धा कुठलीही कमतरता न भासता आपल्या मित्रांसोबत नाचण्याची मजा काही औरच..!! यात एखादा असतोच जो नाचत नाही घुम्यासारखा बसून असतो, शांत असतो; त्याला नाचवण्याचं काम सुद्धा मग चोखपणे पार पडलं जात आणि यात सर्वात महत्त्वाचा भाग किंवा आकर्षण असतं ते म्हणजे आपल्या सरांचा नाच आणि तो तर झालाच पाहिजे या नाचात बरेच insta live करत आपला आनंद शेअर सुद्धा करतात आणि हे सगळं आमच्या बस मध्ये सुद्धा झालं. थोड्या वेळाने गाडी नाष्टासाठी थांबली. फूडमॉल वर थोड खाऊन तिथे बाहेर सर्व्हिस रोड च्या कडेला एक सुदंर ग्रुप फोटो असंच काढला जो अजूनही इंजिनीअरिंगच्या फोटोज् मधील मास्टरपीस आहे.गाडी पुन्हा निघाली...
         आता सगळे जरा शांत होते, हेडफोन्स लाऊन बाहेरच्या रिमझिम पावसाचा आनंद घेत चालले होते. काही वेळानी गाडी पनवेल आणि नंतर उरण कडे पोहोचली, जवळ इतकं मोठं महानगर आहे याचा तिथे भास होऊ लागला, मोठमोठ्या इमारती नव्हत्या  पण औद्यागिक क्षेत्राचा अंश दिसू लागला. रिलायन्स ग्रुपची. भलीमोठी गॅस पाईप्स दिसू लागली आणि समुद्राजवळची आद्रता हवेत जाणवू लागली. कंटेनरचे मागचे डबे..ज्यावर आपण नेहमी MAERSK हे नाव हायवेने बऱ्याच ट्रकच्या मागच्या कंटेनर वर बघतो तसल्या डब्यांचा इथे ढीग होता..!, MAERSK ही एक इंटरनॅशल स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे आणि मालाची ने-आण करते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात प्रथम आलं ते म्हणजे GTA VICE CITY..,ते शहर आणि त्यातील पोर्टचा जणू परिसर आज मी प्रत्यक्षात पाहत होतो, असे मला भासले. आता गाडी न्हावशेवा पोर्ट म्हणजेच जे एन पी टी या बंदराच्या जवळ आली. निमुळते आणि वळणदार रस्ते. तेथली नगरी वसाहत पार करून आम्ही थेट आता पोर्टच्या कर्याल्याच्या समोर सोडणाऱ्या रस्त्याने पुढे सरसावलो. समुद्र दिसू लागला, आम्ही सगळे कुतूहलाने बघू लागलो..गेल्या आठ दिवसांपासून बंदर डोक्यात होत आणि नानविविध कल्पनाही; त्या प्रत्यक्षात अश्या होत्या, कदाचित कल्पनेपेक्षा सुंदरच..!!, आणि एक चेक पोस्ट आलं..एखाद्या टोल गेट प्रमाणेच ते होतं. तेथे आम्हा सर्वांना उतरण्यास सांगितलं..व सर्वांना visiting आय कार्ड देऊन, सर्वांची ओळखपत्र तपासली गेली. आणि  आम्ही रांगेने आत गेलो. बसही आत सोडली आणि आम्ही पुन्हा बस मध्ये बसलो.आमच्या सोबत तेथील एक काकाही आले, वयाने ५५ वर्षाचे तरी असतील ते तेथे नोकरीस होते,  साधारणतः अर्ध्या किलोमीटर अंतरावर समुद्र दिसू लागला. आम्ही अत्यंत उत्सुकतेने पाहू लागलो, त्या काकांनी सूचना केली की मोबाईल कोणीही काढू नये, त्या बंदरावर काही भलीमोठी जहाजं उभी होती, अगदी ३-४ मजली इमारती एवढी!!.. आम्ही सारे अवाक होतो..गाडी अगदी पोर्ट जवळ नेण्यात आली...बंदर आणि किनारा यांमधील फरक किती मोठा असतो ते तेव्हा कळलं. आम्ही अजून गाडीतचं होतो म्हणून त्या जहाजांचे फोटो काढले, जे पाहून आजही मला तो क्षण तशाचा तसा आठवतो. आम्ही खाली उतरलो. थोड जवळ गेलो. खाली जी आहे ती जमीन नसून बांधकाम आहे. हे त्यातील फटांमध्ये पाहिल्यावर कळले, आता आम्ही समुद्राच्या वर होतो.तेथे चालतांना सुद्धा खूप सुंदर वाटत होते, भलीमोठी जहाजं आता आणखीनच भलीमोठी दिसू लागली, मी मघाशी म्हणालो की ती २-३ मजली असतील, पण मलाच अता ती ४-५ मजली वाटू लागली. अथांग समुद्र, दूरवर नजर न्यावी तिकडे पाणीच पाणी. निळ्याशार दिसणारं पाणी, ओसळणाऱ्या लाटा, पण तरीही त्याचा न होणारा होणारा स्पर्श काहीसा नाराजीचा होता. पण, आम्ही बंदरावर होतो किनाऱ्यावर नाही!, प्रत्येक जहाजं मालवाहतूक होत, आणि त्या मालाची लिफ्टींग करण्यासाठी Gantry girders होते, त्या gantry girders चं designing आम्हाला स्टील डिझायनिंग मध्ये होत त्यावर काही numericals सुद्धा होते म्हणून इथे जणू एक आपला ओळखीचा, आणि आपल्यातला माणूस उभा आहे असच आम्हाला वाटल, आणि आम्ही एकमेकांना कुतूहलाने दाखवू लागतो, "तो बघ gantry girder!", खूप मजेशीर होतं ते, हे सगळ निरीक्षण करत असतांनाच एक आवाज आला तो त्या काकांचा होता, ते आम्हाला आता सगळी माहिती सांगणार होते. त्यांनी आम्हा सगळ्यांना गोलाकार उभे केले, आणि यांनी सुरुवात केली, त्यांचा आवाज, उभे राहण्याची आणि बोलण्याची लकब पाहून, ही व्यकी अत्यंत मजेशीर आहे असं मला वाटलं आणि क्षणार्धात त्या काकांनी मला खर ठरवलं, ते खरचं मजेशीर होते, अगदी आजही आम्ही त्यांना त्यांना आठवलं की हसतो.. म्हणजे त्यांच्यावर नाही त्यांनी केलेल्या  विनोदांवर.. त्यांनी सुरुवात केली, त्यांना त्या बंदराची तसेच त्या भागाची इत्तंभूत खबर होती. ते कोकणस्थ होते. मग आम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो घेतला ज्यात आमचे प्रोफेसर सुद्धा होते. हा फोटो जरी अगदी सहज असला तरी या अशा ग्रुप फोटोंच महत्व या visits मध्ये अनन्यसाधारण आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, लास्ट इअरला तर आमची एक road project visit जी syllabus मध्ये होती पण जी राहिली होती, ती आम्ही आणि आमच्या सरांनी फक्त कॉलेजच्या चौकात जाऊन, पोज देऊन एक ग्रुप फोटो काढून पूर्ण केली होती. त्या मजेशीर पोझ मध्ये सगळेच हसत होते आणि अगदी कोणीही सांगेल की, ही पोझ आहे. असा फोटो कलर प्रिंट करून फाईलला आम्ही लावला होता, ते सगळं पाहून external ने सुद्धा डोक्याला हात लावला असेल!!! असो, तर आम्ही फोटो काढला आणि बंदर सफारी करू लागलो, तेथून अगदी भुरसट स्वरूपात दक्षिण मुंबईच्या उंच इमारतीही दिसत होत्या. 
        जहाजांना जास्तकरून लाल रंग असतो, कारण तो दुरूनही ओळखता येतो आणि आपत्कालीन काळात याची मदत होते, जवळपास सरीच लाल जहाजं म्हणूनच तिथे होती, किंवा अंशतः लालच होती, बराचं वेळ त्या रम्य आणि सुंदर ठिकाणावर घालवल्यानंतर आम्ही पुन्हा बस मध्ये. एव्हाना खूप भूक सुद्धा लागली होती. आणि आता गाडी बंदराला विळखा घेऊन जे.एन.पी. टी. बंदराच्या मुख्य कार्यालयाकडे वळाली. मुख्य इमारत जवळच होती, अतिशय सुरेख बांधकाम होतं ते!..बाजूस छोटीशी बाग होती, तेथे आत बंदरातील कर्मचारी आणि अधिकारी यांची दालने होती, तसेच त्यांची कॅन्टीन देखील होती. आमचे प्राध्यापक आत परवानगीचा कागद घेऊन आत गेले, आम्ही त्या पलिकडील बागेत जाऊन बसलो. आज खरचं खूप वेगळा आणि अविस्मरणय दिवस आहे, ज्याच्या आठवणी आता नेहमीच आपण आपल्यासोबत घेऊन फिरणार आहोत, कुठे विषय निघालाच तर, "मी येथे गेलो आहे, हे मी पाहिले आहे!!" असं अभिमानाने सांगता येणार आहे. असं काहीसं माझ्या मनात चालू होतं किंबहुना अप्रत्यक्षपणे प्रत्येकाच्या!!, आम्ही तेथे ग्रुप मध्ये बसलो दुपारचे जवळपास २:३० वाजले असतील. वातावरण तसं ढगाळ होतं, आणि वेळेचं भान राहावं असा तो दिवसही नव्हता!! थोड्या वेळानंतर आम्ही आत गेलो. ती भलीमोठी इमारत होती, त्याच्या एका भागात त्या कर्मचऱ्यांची मोठी कॅन्टीन होती. तेथे आम्ही जेवणासाठी गेलो. "इथे काय जेवण असणार आता, त्यापेक्षा हायवेवर कुठेतरी ढाबा बघितला असता, असा सूर वाजत होता!", परंतु, तेथील स्वच्छता व जेवण पाहिल्यानंतर आमच्या भ्रमनिरास झाला. आमच्यासाठी म्हणून एक विशिष्ट मेन्यू तेथे केला होता आम्ही सगळे तेथे बसून जेवलो. थोड्या वेळानंतर पुन्हा त्या सगळ्यांचा जेवण झाल्यानंतर सारे बाहेर आलो. तेथूनही पोर्ट दिसत होता, तेथे काही फोटो काढून आम्ही निघालो, दरम्यान तेथे एक छोटे दुकान होते, आणि त्या दुकानातील दुकानदार काका हे आमच्या जळगांव जिल्यातील आहेत हे कळाले. मित्रांनी मला बोलावले व त्यांना सांगितले हा सुद्धा तेथीलच आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर कळाले की ते आमच्या अमळनेर तालुक्यातील च आहेत. त्यांनी अगदी आपुलकीने चौकशी देखील केली. खरचं गावापासून दूर असताना आपल्या गावाचं कोणी भेटलं तरी ती व्यक्ती आपल्याला अगदी आपलीच वाटते. 
        आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. दिवसभर दमल्याने सारे जरा शांत होते. गाडी पुन्हा पनवेलच्या दिशेने निघाली, नंतर बाहेर जोरात पाऊस सुरू झाला.रम्य दृष्य होते ते. मग  द्रुतगती मार्गास लागली आणि वेगही वाढला. मग शांत असलेले आम्ही सारे  पुन्हा जरा गोधळ करू लागलो. गाणे लाऊन नाचूही लागलो. मग त्यात कोणीतरी बोलला की, सगळ्यांनी सगळ्यांचा नाच सकाळी बघिलाच आहे, आता आवाज बघुयात. गाणी बंद करून सगळी गायला लागली. खर तर खूप छान दृश्य होत. बाहेर पाऊस, प्रवास आणि गाणी.. वाह!! मग सगळ्यांनी मला गाणं गायला सांगतलं..मी नुकतच NAAC इव्हेंट साठी 'सूर निरागस हो..." हे गीत गायले होते..आणि साहजिकच त्याची फरमैश झाली...मीही गायलो. राहत फतेह अली खान आणि मोमीन मुस्तेहन यांचं आफ्री आफ्रि गायालो. खरं तर खूप सुंदर गाणं आहे. हे गाणं बऱ्याच जणांनी ऐकत नव्हत आणि त्यांना आवडलं, मग त्यांना मी ओरिजनल क्लिप दाखविली. आणि त्यातील मोमिना मुस्टेहन या पाकिस्तानी गायिकेचा प्रेमात आमचं निम्न डिपार्टमेंट पडलं. आता तिच्या आशिक मंडळींत हे सारे सुद्धा आहेत. होय, सुद्धा म्हणजेच मी आधीच जाऊन बसलोय तिथे!!! आता थोडं अंधार पडू लागलं आणि गाडी ट्रॅफिक मध्ये अडकू लागली, वाकड जवळ आम्ही होतो. आणि सायंकाळची ट्रॅफिक! जवळपास एक - दीड तासांनी आम्ही पुन्हा नऱ्हेत पोहोचलो. आणि ती अविस्मरणीय ट्रीप कम् व्हिजिट किंवा व्हिजिट कम् ट्रीप संपली होती. 

Sunday, June 7, 2020

"नमस्कार, मी काँक्रिट बोलतोय..!!"

///
हळूच कोठूनसा आला आवाज, "बोलायचय मला तुझ्याशी आज!"
टेकून होतो बसलो भिंतीशी, वळून पाहता column कडे झालो मीच अवाक!!
"नमस्कार, मी काँक्रिट!!",म्हणत केली त्याने सुरुवात,
"ओळख आपली तशी जुनी फार!"
"आठवत असेल तुम्हा माणसांना, पूर्वज होते काही आहेत गावी माझे"
" मातीची घरे अन् कौलारू छते, राहुनी त्यांत तसं गार गार वाटे!"
"सुरक्षित नेहमी ठेवावं तुम्हास असं त्यांनाही वाटे, भक्कम जरी नव्हती खूप, संस्कृती जपण्याची होती भूक!"
.
" बरेच महापूर पाहिले त्यांनी, पहिल्यात बऱ्याच आपत्ती!!"
"टिकून राहिले जागी परी, काही मोडले जरी, तरी लढले सर्वतोपरी!! "
"त्यांचीच आम्ही मुलेबाळे, दिवसागणिक रूप बदलले"
"चुन्याच्या जागी सिमेंट आले, कौलाच्या जागी slab"
"माझी निर्मिती ठरली बांधकामासाठी चमत्कार!"
"Steel सोबत माझी करून युती, गाठता येईल जास्त मजबुती, झाला काहीसा साक्षात्कार!!"
"आता मात्र मी झालो होतो आणखीन प्रबळ, खंबीर उभा राहिलो माजली जरी खळबळ!"
"भूकंपाशी दोन हात करण्याची ही दिलीत मला शक्ती"
.
"आली वादळे, अगणित पावसाळे, कधी पडल्या विजा, "सांगत राहिलो नेहमी मात्र तुम्ही निश्चिंत होऊन नीजा!!"
"माझा वापर आहे अधिक, पाण्यानंतर जगात दुसरा";
" उंचच उंच गेलो वाढीत, पाण्याचा मात्र रोखीत निचरा!!",
"कॉक्रीट चे जंगल म्हणता तुम्ही माझ्या दाट वस्त्यांना ऐकल कुठे तरी, हसू आले ऐकून परी!",
"तुमच्या भरभक्कम हक्कच्या जागेसाठी निसर्ग काहीसा झुकवला आम्ही!",
.
"निसर्ग राजा आहे, झुकेल तरी का सारखा??" "माणूस प्राणी हुशार फार, शोधत गेला नवीन आसरा",
"दिवसामागून दिवस गेले, जातायत, पण अचानक लक्षात आले काहीसे, बाहेर आता जात नाहीत तुम्ही फारसे",
"म्हणे घरीच सद्या राहणे आहे सोयीचे",
"दिवसभर हा tv न्यूज चॅनेल ने खणाणतो, बातम्या मात्र रोजच भयावह सांगतो",
"कोरोना नामक राक्षस म्हणे हात लावूनही पसरतो, औषध निघाली नाहीत अजून, म्हणून मात्र जरा बिथरलो",
"ही संस्कृती, मानव समाज, घट्ट बांधून ठेवल्याचे दिलेले वचन काहीसे आठवले मग, लगेच झालोय व्यक्त मग"
.
"आम्ही आहोत सोबत परी, घट्ट जोडलेल्या या concrete बाहेर कोरोनालही ठेवतो रोखून",
"आपत्ती पुढे ना तुम्ही झुकतात कधी, ना आम्ही",
"मिळूनी राहू नेहमी, येऊ एकमेका कामी",
"रहा माझ्या कुशीत, ठेवतो तुम्हास सुरक्षित"
"आपत्ती वेगळी आहे जरा,पण रोखून धरणे माहित आहे मला!"
"बांधतांना माझ्यावर सुरक्षिततेचे झालेत आहेत अनंत संस्कार, तुम्ही बांध सोडू नका!"
"नियम पाळून सगळे, तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही धीर सोडू नका!!"
.
-प्रतिक विकास पाटील

Ya, here's the DECEMBER, to assemble...

 /// And just assemble it, Which had been broken! Be ready with; The new door coupons; Which we've to open, The glimpse of the this way;...