"कौले"...एक लुप्त होत जाणारं बांधकाम मटेरियल..हो खरचं....आता कौले तशी फारशी दिसत नाहीत...नाही का!..तरी कोकणात गावांत अजूनही आहेत. पण कोकणापलीकडे इतर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात कौले हे बांधकामातील छप्पराचे मटेरियल बहुधा शाळांना वापरण्यात येई. प्रत्येक गावाखेड्यातली शाळा कौलारू असे किंबहुना आहेत. अजूनही मतदान वगैरे करण्यासाठी जेव्हा शाळेत गेल्यावर, त्या जुन्या आठवणी व आपण लहान होतो, त्याच्या कितीतरी आधीपासूनच असलेली ती टुमदार कौलारू शाळा, आपण मोठे झालो तरीही तशीच, बऱ्याच वर्षांची व बऱ्याच बालपणांची साक्ष घेऊन आपल्याला उभी दिसते..आणि मग पुन्हा आपल्या बालपणात घेऊन जाते.
खूप गम्मत दडलेली असते कौलारू शाळांमध्ये... वर पाहिलं की अत्यंत भव्यतेच दर्शन वर्गात असताना होत असे..कारण, कौलाचा घुमट मोठा असतो. त्यावर लाकडी त्रिकोणाकृती आकृती असते. ज्याला "ट्रस" म्हणतात हे नंतर कळलं. त्यांवर पंखे लटकवलेली असतं. पण तेव्हा ते सगळं मजेशीर होतं. भिंतीही अत्यंत मोठ्या आणि टुमदार वाटत. ज्यात वरच्या बाजूस त्रिकोण आकार असे. त्यांवर सुविचार, काही थोर व्यक्तींची छायाचित्रे.. (छायाचित्रे कधीही चिकटवलेली नसून ती सुंदरपणे रेखाटलेली व सुबक पणे रंगवलेली असत), शाळेचा काही दस्तऐवज ठेवण्यासाठी दोन खुंट्यांमध्ये अडकवलेली एक फळी, ज्यावर ठेवलेली ती जुन्या धूळखात पडलेल्या काही फाईली (फाईल्स). बरं हे सगळं दस्तऐवज कोण्या एकाच वर्गात लटकवलेली दिसत, या सगळ्याचा भार एकच वर्गावर असे. मग त्या उंचच उंच भिंतींवर चारही बाजूंस दिशेची नोंद असे. म्हणजे, पूर्व पश्चिम असे लिहिलेले असे. त्या भिंती जर आपल्या आताच्या बांधकामाप्रमाणे चौरसकृती, अगदी टापटीप जरी असत्या तरी ती गम्मत किंवा तो अवाढव्यपणा ज्याला आपण भव्य असंही म्हणू शकतो तो कदाचित नसता...
कौलांचेही काही प्रकार असतात, ज्यात काही कौले गोलाकार स्वरूपात आढळतात तर काही आयताकृती आणि त्या लाकडी सांगाड्यावर ती विशिष्ट स्वरूपात अडकवलेली असतात. ज्यासाठी कौलांनाही विशिष्ट स्वरूपाचे खाचे असतात. ज्याला आपण 'कट्स' म्हणू शकतो. बऱ्याचदा ही कौले फुटत, चेंडू लागून म्हणा किंवा काही आगाऊ नग उगाच मस्ती म्हणून दगडेही मारत. मग उन्हाची तिरीप वर्गांत झंकरायची. त्या तिरीपनुसार मग मुले अॅडजस्ट होत.. बऱ्याचदा शाळेच्या आवारात ती फुटलेली कौले पडलेली दिसत, ज्यास शिक्के म्हणून मुले वापरत असत. म्हणजे पेन्सिलने ज्यावर काहीतरी लिहावयाचे आणि ते हातांवर उमटवायचे..झाला शिक्का..त्यात कोणी बहाद्दूर बरोबर उलटे नाव लिहा मग ते सुलटे होऊन उमटे... भारी गम्मत होती यांत..कौले गोळा करणे हा त्यावेळेस काही लोकांचा जणू छंदच आहे असे ते वागत. त्यांना त्या वेळेस कोणी विचारले असते की छंद सांगा, आणि ते कौले म्हटले असते तर यात वर्गात कोणासही काही वावगे वाटले नसते. कारण, तो तेथे एक मान्यताप्राप्त छंद म्हणून उदयास आला होता. ज्यापासून नुसते शिक्के च नव्हे तर आणि खूप अश्या गोष्टी करता येत असत. त्यांची घरे, किल्ले , घाट , बोगदे, आणि बरेच काही. अशी कौले बालपणाच्या शाळेतील एक खूप महत्त्वाची आठवण आहेच आणि नेहमीच राहील.
मग ज्यावेळेस पावसाळा येत असे, म्हणजे नुकतीच शाळा सुरू होई तेव्हा काही कौले फुटली असल्याने किंवा कौलारू रचनेमध्ये कोठे बारीक छिद्रे राहिल्यामुळे ती गळत आणि पाण्याची धारही लागे. मग नुकतीच नव्या वर्गात आलेली आम्ही सारी मंडळी जुन्या वर्गाची आठवण काढत. व ते वर्ग किती छान होते वगैरे वगैरे कुजबुज काही दिवस चालू असे. मग काही दिवसांनी हा वर्गही आपला वाटू लागे. मग पुन्हा त्या वर्गसजावटी सुरू होत विवध तक्ते, गणिती सूत्रे, यांचे पोश्टर्स लावले जात, या सगळ्यात गमतीशीर तक्ते असत ते वरती दोरीस जोडलेले तक्ते ते तरंगत असत, काय सुंदर दिसायचे वर्ग तेव्हा..!! आणि त्यात भर म्हणून पताके. पताक्यांना भारतीय सजावटीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थात ते साधे जरी असले तरी परिसर गजबजून सोडायचे लकब त्यांच्यात आहे. अश्या सुंदर सजावटीमध्ये जी आम्हीच केलेली असायची त्यामुळे शाळा आणि वर्ग आणखीनच हवेहवेसे वाटायचे. या पावसाळी दिवसांत बऱ्याचदा मैदान ओले असल्यामुळे अथवा पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याचदा प्रार्थना, राष्ट्रगीत हे व्हरांड्यात होत असे. टुमदार कौलारू शाळांचा व्हरांडा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असे. असा अत्यंत रुंद किमान चार पाच फारशा असलेला तो व्हरांडा! त्यात सगळी मुले दाटून भरून राष्ट्रगीत म्हटले जात असे, आणि पार्श्वसंगीत म्हणून पावसाची रिपरिप आणि सोबत कौलांवर पडणाऱ्या थेंबाचा आवाज. मग प्रतिज्ञा म्हणातांना पुढच्या खांद्यावर हात ठेवण्याची जणू मुबाचं मिळाली आहे असे थाटात हात टेकवणे. कारण येथे व्हरांड्यात सारेच दाटीवाटीने भरलेले. मग काही दिवसांनी एखादा रविवार पाहून शाळा कौले दुरुस्तीचा कार्यक्रम आखत असे. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर एकही उन्हाची तिरीप न पाहून अवाक होणारे चेहरे आणि नवीन कौले बसवल्याची माहिती होणे हे काही महिन्यातून होतच असे. आता माझी प्रार्थमिक शाळा आठवली; तर आमचे सर सुद्धा मला आठवतात आणि त्या वेळेस अशी पद्धत होती की प्रायमरी शाळांत म्हणजेच १ली ते ४थी पर्यंत एकच शिक्षक शिकवत, (आता आहे की नाही माहित नाही), शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं तस एकदम घट्ट होत असे. आणि एके दिवशी आम्ही ४ थीत असताना आमचे सर आम्हास सांगू लागले की, माझी बदली झालीय आणि मला आजच शाळा सोडावी लागेल. आम्हा सगळ्यांना जणू धक्काच बसला, खूप वाईट वाटल. कारण, खूप आवडते सर ज्यांनी शिक्षणाची गोडी लावली ते शाळा सोडणार होते, आम्हीही आता ४थी नंतर मोठ्या शाळेत जाणार होतो, कारण शाळा १ली ते ४थी एवढीच होती. पण अजून ४ थीच वर्ष अर्धे बाकी होते आणि सर सोडून जाणार म्हटल्यावर अख्ख्या 'अ'तुकडीला म्हणजे आमच्या वर्गास खूप दुःख झाले. जेव्हा सर दुपारी जाण्यास निघाले तेव्हा आमचा अख्खा वर्ग बाहेर होता. आणि आम्ही अक्षरशः रडलो होतो. मग सगळ्यांनी सरांच्या पाया पडून सरांना निरुप दिला. शिक्षक आणि विद्यार्थी हे नात किती सुंदर असु शकत याचं प्रात्यक्षिक त्या दिवशी आम्ही आणि आमचा सरांनी अख्ख्या शाळेस दाखवलं आणि अप्रत्यक्षपणे आम्हा स्वतःसही... खरे तर शाळेचे किस्से हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अमूल्य ठेवा असतो. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आणि आठवणी आपल्याला त्या विश्वात घेऊन जाऊ शकतात जस की, कौलांवरून मी या आठवणी वर आलो..असो पण शाळेतील कौलारू छ्ते उंचच उंच अशा भिंती पुढे आपण कितीही चकचकीत महाविद्यालयात अगदी वातानुकूलित वर्गात जरी शिकलो, वावरलो तरी त्या कौलारू वर्गांसाठी एक वातानुकूलित खोली आपल्या मनात नेहमी दडलेली असते हे मात्र नक्की...!!
Sundar👌💫
ReplyDeleteThanks Pranav 💟😊
Delete