Wednesday, July 29, 2020

रोज रात्री ताऱ्यांच्या जगात...

///
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात,
संग चंद्र अन् नभ अफाट,
सीमा नसलेल्या मोकळ्या अंगणात,
निळ्याशार आथरलेल्या विस्तीर्ण छपरात;
मी काहीसा शोधतोय मला !!!
.
नटले आहेत नभी तारे अफाट;
सुटले आहेत जरी वारे सुसाट;
पाय रोवून होऊनी खंबीर, 
उभे राहणेही शिकतोय जरा..!!!
.
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमध्येही;
शोधतोय काही ठळक तारे,
भेदून टाकतायत ते जणू नभ सारे,
सप्तकात ताऱ्यांच्या शोधतोय सात सूर;
अवकाशी संगीत जगणारे ते जणू सात शूर,
घट्टपणे जोडलेल्या सप्तकात आहे कोणते नाते?
विणतोय काही तसेच अमूल्य धागे...
.
चंद्राचे सुंदर रूप पाहून;
मनी शीतलतेचे झरे वाहून;
शीत काहीसा होतोय जरा,
डाग असूनही भिडणारे सौंदर्य,
शांत, आणिक स्थिरतेचे कौशल्य,
काळोख्या रात्रीत लख्ख होणारा,
नवनवीन रूपांत दंग होणारा;
चंद्र मनी उमटवतोय जरा!!
.
वाटसरु मी अनेक वाटांचा;
समुद्र होऊन दीर्घ लाटांचा,
समावणाऱ्या अगणित शिंपल्यांचा,
आकुंचनाऱ्या ओहोटीचा;
दोन पाऊले मागे घेणारा समुद्र पाहून;
माघार घेणे शिकतोय जरा..!!
.
पुन्हा येऊन उत्साहात;
भेदत जाऊनी किनाऱ्यास,
भरतीचा समुद्र पाहुनी,
भरारी चे धडे गिरवतोय जरा..!!
.
ताऱ्यांच्या जगात रममाण होऊन;
अंधुक वटांना प्रकाश देऊन;
शांत आणिक सज्ज होऊन,
वाट स्पष्ट करतोय जरा!
वाट स्पष्ट करतोय जरा!!
. - प्रतिक ©
.

No comments:

Post a Comment

Ya, here's the DECEMBER, to assemble...

 /// And just assemble it, Which had been broken! Be ready with; The new door coupons; Which we've to open, The glimpse of the this way;...